दोडामार्ग पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती व सदस्यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
दोडामार्ग: सुहास देसाई
पाणलोट क्षेत्रात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. या आरोपांचे सत्य काय आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कमिटीचे अध्यक्ष, सचिव, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची येत्या १५ दिवसांच्या आत संयुक्त बैठक घ्या. या बैठकीत सर्व आरोपांचे निरसन करून पत्रकार परिषदेत अधिकृत खुलासा करा, तसेच केलेल्या कामांचा सविस्तर आढावा समितीला सादर करा, अशी जोरदार मागणी उपसभापती आणि सर्व सदस्यांनी मासिक सभेत पाणलोटच्या अधिकाऱ्यांकडे केली.
दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सायली निंबाळकर, उपगटविकास अधिकारी यशवंत गवस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सभेत महावितरणच्या कारभारावर सदस्य संतप्त झाले काही गावात चार ते पाच दिवस वीज नव्हती तसेच पावसाळ्यातील विजेचा लपंडाव आणि आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वीज वितरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. “विजेचा लपंडाव थांबवून जनतेच्या समस्या दूर करा. गणेशोत्सवात विजेची एकही तक्रार येता कामा नये, या पद्धतीने काम करा. वीजवाहिन्यांवर आलेली झाडे तातडीने तोडून लाईन साफ करा,” अशा शब्दांत सर्वच सदस्यांनी महावितरणच्या कारभाराचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तिलारी नदीकाठी सूचना फलक लावण्याचे निर्देश
तिलारी नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी अपघातांची शक्यता लक्षात घेता, तेथे तात्काळ सूचना फलक लावण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर बोलताना कुडासे, मणेरी, घोटगे, घोटगेवाडी आदी धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावून संभाव्य अपघात रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना तातडीने सूचना देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
तिलारी खोरे हत्तीबाधित भागात टॉर्च वाटप करा या भागात शेतकरी यांना गरज आहे तसेच
तालुक्यातील हत्ती प्रभावित आणि आपत्तीग्रस्त भागाचा मुद्दा उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी लावून धरला. “हत्तीग्रस्त भागातील नागरिकांना वनविभागाच्या वतीने तात्काळ टॉर्च (बॅटरी) वाटप करण्यात यावे आणि या संपूर्ण कामाचा आढावा समितीला सादर करावा,” अशी मागणी गवस यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.
या मासिक सभेत तालुक्यातील विकासकामांसह जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.













