साटवली विद्यालयात पार पडला शिक्षक-पालक मेळावा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

लांजा ( प्रतिनिधी)

तालुक्यातील साटवली येथील  रा. सि. बेर्डे माध्यमिक विद्यालय व कै. सौ . श्रु . य. बेर्डे ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित शिक्षक-पालक मेळावा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच विद्यार्थी कल्याणकारी उपक्रमांचा भव्य कार्यक्रम ‘मातोश्री सत्यभामा सभागृहात’ नुकताच उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात इयत्ता १० वी व १२ वीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याचबरोबर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि इयत्ता ८ वी ते १२ वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वितरण करून विद्यार्थ्यांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी संस्थेने कृतीतून अधोरेखित केली.
इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनी कु. मुनाजत मुनीर इस्माईल हिने जीवशास्त्र विषयात १०० पैकी ९२ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. विषय शिक्षक श्री. गुरव यांच्या हस्ते तिला विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने साटवलीतील आंबा उद्योजक सादिक कोंडकरी आणि संस्थेचे सचिव आदेश आंबोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शशिकांत जाधव, उपाध्यक्ष महेंद्र नाकर, सचिव तथा लांजा तालुका उपसभापती आदेश आंबोळकर, खजिनदार युसुफ काजी, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील मान्यवर, आजी-माजी सरपंच, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनिल (राजू) पुरुषोत्तम शेलार यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद केंद्रशाळा साटवली (मराठी) येथील इयत्ता १ ली ते ७ वी तसेच इयत्ता ८ वी ते १२ वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वितरण करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची स्तुत्य घोषणा यावेळी करण्यात आली. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन कस्तुर, कोषाध्यक्ष प्रशांत भालेकर व इतर सदस्यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महेंद्र शंकर नाकर यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री. भालेकर यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. कदम यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन श्री. गुरव यांनी केले.