गडनदीतील गाळ काढल्याने माखजन बाजारपेठेला पूराचा धोका काही अंशी टळला

गौरव पोंक्षे माखजन
दोन तास धुवाधार पाऊस पडला की माखजन बाजारपेठेत लगेच गड नदीचे पाणी घुसत असे.पण यावर्षी गाळ उपसा झाल्याने बाहेर धुवाधार पाऊस पडत असून देखील माखजन् बाजारपेठेत अद्याप पाणी घुसलेले नाही.
जिल्हा नियोजन मधून निधी खर्च करून ,माखजन ग्रामपंचायतीच्या सुनियोजनातून माखजन नजीक गडनदीतील गाळ मोठ्या प्रमाणात उपसल्यामुळे,पात्र रुंद झाले.व खोली देखील वाढली.यामुळे पाणी सामावून घेण्याची क्षमता,व पाण्याची निचरा करण्याची क्षमता वाढली आहे.
माखजन बाजारपेठेत सतत पाणी भरल्याने येथील व्यापाऱ्यांचा चार महिने व्यापार हा बेभरवशी होता.जोराचा पाऊस पडायला सुरवात झाल्यावर व्यापाऱ्यांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे.परंतु गेले चार दिवस धुवाधार पाऊस पडत असल्याने पंचक्रोशीतून वाहून येणाऱ्या ओढ्याना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.हे सगळे पाणी गडनदीला येऊन मिळते.परंतु गड नदीचे पाणी अद्याप माखजन बाजार पेठेत उलटलेले नसल्याने केलेल्या कामाचे समाधान व्यक्त होत आहे.
सरपंच महेश बाष्टे यांनी गाळ काढल्याने माखजन बाजापेठ बऱ्यापैकी पुराच्या तडाख्यातून वाचली आहे.सर्व सामान्य पाऊस पडला तरी माखजन बाजारपेठेत पाणी येत होते.परंतु यावेळी लक्षणीय फरक जाणवत असल्याचे महेश बाष्टे यांनी स्पष्ट केले.
गडनदीच्या पुरामुळे पाणी घुसल्याने व्यापारांचा माल भिजत असे,शासना कडून काहीही मिळत नसल्याने ,न बोलता बुक्क्याचा मार अशी परिस्थिती व्यापाऱ्यांची होत असे.सध्या गाळ उपशामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.