हेत–मौदे मार्गावर मातीचा भराव आल्याने वाहतूक काही काळ ठप्प
वैभववाडी प्रतिनिधी :
रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे सकाळी हेत येथे अरुणा धरणाच्या कालव्यालगतची माती रस्त्यावर आल्याने हेत–मौदे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे मार्गावरील माती हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, गेल्या २४ तासांत तालुक्यात १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळी अरुणा धरणाच्या कालव्यालगतचा मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहनांची वाहतूक थांबवावी लागली. माहिती मिळताच संबंधित विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली माती हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
सायंकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सायंकाळी उशिरापर्यंत तालुक्यात अन्य कोणत्याही मोठ्या नुकसानाची नोंद झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.













