कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची मुंबईतील प्राप्तिकर विभागात कर सहाय्यकपदी थेट नियुक्ती झाली आहे.अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अनिकेतने आता शासकीय सेवेतही यशाची नवी उंची गाठत युवा खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
२०१७ मध्ये भारतात झालेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा अनिकेत एकमेव खेळाडू आहे.
तसेच २०२३ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्याला मिळाला होता. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी दमदार खेळ करत त्याने कोल्हापूरचे नाव देश-विदेशात उंचावले आहे. खेळातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी, जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर अनिकेतची आता मुंबई येथील प्राप्तिकर विभागात कर सहाय्यकपदी निवड झाली आहे.
अनिकेतच्या फुटबॉल करिअरमध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन आणि माझे आई, वडील आणि बहिणीचे प्रोत्साहन लाभले.
क्रीडा क्षेत्रातील यशानंतर शासकीय सेवेत मिळविलेले यश कोल्हापूरसाठी अभिमानास्पद मानले जात आहे. संयुक्त प्राप्तिकर आयुक्त अभिषेक थरवाल यांनी अनिकेतला नियुक्तीपत्र दिले. अनिकेतच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, माजी खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशामुळे कोल्हापूरच्या युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.













