शहरातील सर्विस रोड आहेत की खेडेगावातील एखादा नादुरुस्त रस्ता ?

सर्विस रोडच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा सवाल

लांजा (प्रतिनिधी) : लांजा शहरातील सर्विस रोडची सध्या बिकट अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून वाहने चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून हे शहरातील सर्विस रोड आहेत की एखाद्या गावातील नादुरुस्त रस्ता? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
लांजा शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील सर्विस रोडची कामे अनेकदा करण्यात आली. मात्र सध्या पडणाऱ्या पावसामुळे या सर्विस रोडची अवस्था फार बिकट बनली आहे. लांजा उपशेट्ये वाडी ते लांजा एसटी डेपो पर्यंतच्या दरम्यान या सर्विस रोडची अवस्था फार गंभीर बनली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून दुचाकी रिक्षा व अन्य वाहने चालवताना चालकांची तारेवरती कसरत होत आहे.
सर्विस रोड तयार करताना किती दर्जात्मक काम बनवले जात आहे याचा नमुना सध्या लांजा शहरात सर्विस रोडच्या कामा वरून दिसून येत आहे. या रोडवरून चालताना पादचाऱ्यांची अवस्था फार बिकट होत आहे. लांजा शहरातील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
एकूणच सध्या सर्विस रोडची झालेली दुरावस्था पाहता खेडेगावातला एखादा रस्ता बरा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.