नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम सुरू
राजापूर (वार्ताहर): गेल्या दोन दिवसांपासून राजापूर शहर आणि तालुक्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर सोमवार सकाळपासून विश्रांती घेतली आहे. संततधार पावसामुळे निर्माण झालेली पूरसदृश्य स्थिती आता ओसरली असून, विस्कळीत झालेले जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत आहे. पाऊस थांबल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून शहरात स्वच्छता मोहिम तर ग्रामिण भागात शेतीच्या कामांना गती आली आहे.
शनिवारपासून राजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बाजार पेठ आणि इतर भागांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. यामुळे रविवार संपूर्ण दिवस शहर परिसरातील व्यवहार ठप्प झाले होते आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.
रविवारी पावसाचा वाढता जोर आणि नद्यांची वाढती पातळी पाहता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून रविवारीच प्रशासनाकडून तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान सोमवार सकाळपासून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असून पूर ओसरू लागला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर राजापूर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा चिखल आणि साचलेला कचरा साफ करण्यासाठी राजापूर नगर परिषदेने युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे.
मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणावर बसला होता. ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते, परिणामी चालू असलेली शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे आणि शेतातील पाणी ओसरल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा शेतीच्या कामात व्यस्त झाला असून भातलावणीच्या कामांना वेग आला आहे.













