सिंधुदुर्ग : ओरोस येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या गोवा दारू जप्ती प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसादजी करंदीकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गोवा दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच एक कोटीहून अधिक किमतीची गोवा दारू जप्त केली असली, तरी या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि संबंधितांपर्यंत पोहोचून कारवाई होणे आवश्यक आहे.
दारू खरेदी करणाऱ्यांकडे वैध परवाना नसताना त्यांना दारू विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणातील अवैध दारूची वाहतूक महाराष्ट्राच्या सीमेत कशी प्रवेशली, ती कोणत्या मार्गाने आली आणि संबंधित तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यापूर्वीही गोवा दारू वाहतुकीसंदर्भात विविध कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये केवळ वाहतूक करणाऱ्यांवरच नव्हे, तर संपूर्ण रॅकेट उघड करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित व्यक्ती व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.













