आंबोली-बेळगाव वाहतूक ठप्प, वीज पुरवठा खंडित
सावंतवाडी:
येथील माडखोल-धवडकी परिसरात आज सायंकाळी झालेल्या वादळसदृश्य वाऱ्यामुळे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माडखोल-धवडकी भागात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, राज्यमार्गालगत असलेले एक मोठे झाड थेट रस्त्यावर उन्मळून पडले. झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे आंबोली-बेळगाव मार्गावरील वाहनांच्या दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णतः खोळंबली.
या झाडाचा काही भाग शेजारीच असलेल्या लोहार शाळेवर पडल्याने शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. तसेच, झाडाच्या मोठ्या फांद्या तेथून जाणाऱ्या मुख्य वीज वाहिन्यांवर (केबल्स) पडल्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्याचे आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.













