तलावाचे पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी ‘कर्नाटक फायर अँड सेफ्टी’ या कंपनीवर दंडात्मक कारवाई

तलावाकाठी कचरा टाकणऱ्यांना देखील कारवाईचा इशारा

सावंतवाडी : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक मोती तलावात अग्निशामक यंत्राची पावडर टाकून तलावाचे पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी ‘कर्नाटक फायर अँड सेफ्टी’ या कंपनीवर २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विभागाने ही धडक कारवाई केली. तसेच तलावाकाठी कचरा टाकणऱ्यांना देखील कारवाईचा इशारा दिला आहे.

मोती तलावाच्या पाण्यात अग्निशामक यंत्रातील पावडर टाकण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांत संताप व्यक्त झाला होता. याची प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेचे आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ‘कर्नाटक फायर अँड सेफ्टी’ कंपनीला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईसोबतच नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नागरिक व व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे. मोती तलावात कोणत्याही प्रकारचा कचरा फेकणाऱ्यांसह, तलाव काठच्या कचरा पेट्यांमध्ये तसेच निर्माल्य कलशामध्ये घरगुती कचरा टाकणाऱ्यांवरही यापुढे कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांना देखील यापूर्वी नोटीसा बजावल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर घरगुती कचरा हा घंटा गाडीस देण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून तलावाचे स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.