आवळेगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात

आवळेगाव

विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या दोन दिवसीय “क्रीडा महोत्सवा” ला आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे आज शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात सुरुवात झाली.

सकाळी ठीक ७.३० वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा नियमांची शपथ घेतली. आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रशांत सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यमान संचालक व माजी केंद्रप्रमुख सुहास सावंत* हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक डी. टी. काळे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रशांत सावंत म्हणाले, “आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आरोग्य हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. निरोगी आयुष्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात यशस्वी होऊन उत्तम करिअरही करता येते. दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे, त्यामुळे मुलांनी आपले क्रीडा गुण हे क्रीडा महोत्सवासारख्या स्पर्धांमधून विकसित करावेत.”

“वर्गात तुम्ही इतिहास, भूगोल शिकता, पण मैदानावर तुम्ही आयुष्य शिकता. कबड्डीत तुम्ही शिकता – एकट्याने नाही, संघाने लढायचं. धावण्यात तुम्ही शिकता – कोणी कितीही पुढे गेलं तरी शेवटपर्यंत हार मानायची नाही. उड्यांमध्ये तुम्ही शिकता – पडलो तरी पुन्हा उठायचं. खेळात हार-जीत असतेच. पण जो आज हरतो तो संपत नाही, तो शिकतो. ट्रॉफी एकालाच मिळेल, पण जिंकणार तुम्ही सगळेच आहात,” असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी सुहास सावंत म्हणाले, “शारीरिक आरोग्य उत्तम असल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. उत्तम आरोग्यासाठी विविध खेळांची व व्यायामाची नितांत गरज आहे.”

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जी. बी. कांबळे सर यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक धुमाळे सर, पालव सर, मानसी कुंभार मॅडम, कुडाळकर मॅडम, विद्यालय लेखनिक वेदांत सावंत, शिक्षकेतर कर्मचारी सूर्यकांत बावदाने, विनायक सावंत, एकनाथ मोर्ये यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर विद्यार्थ्यांचे धावणे, लांब उडी, उंच उडी, कबड्डी, खो-खो इत्यादी सामने उत्साहात पार पडले. या क्रीडा महोत्सवाचा दुसरा दिवस शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण स्नेहसंमेलन ला होणार आहे.