सावंतवाडी:
सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव यांना स्वतःचे हक्काचे वाहन नसल्याने गेल्या काही काळापासून मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. त्यांना अधिकृत कामासाठी चक्क गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन वापरावे लागत होते. याची तात्काळ दखल घेत अखेर आज जिल्हा परिषदेकडून सभापतींना त्यांच्या हक्काचे नवीन वाहन सुपुर्द करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते हे वाहन सभापती सुस्मिता जाधव यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाने वेगाने हालचाली करत सावंतवाडी सभापतींच्या वाहनाचा प्रश्न मार्गी लावला.
या वाहन सुपुर्दगी सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, काका कुडाळकर, रूपेश कानडे, तसेच सावंतवाडीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव, शितल कुंड, जितेंद्र सावंत आदींसह पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हक्काचे वाहन मिळाल्याने आता सभापतींना शासकीय कामांसाठी ग्रामीण भागात दौरे करणे अधिक सोयीचे होणार आहे.













