‘मुलांचे शिवराय’ उद्या मालवणात कार्यक्रम

शिवशंभू विचार मंच मालवण व श्री शिवराज मंच मालवण यांच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने याच उद्देशाने ‘मुलांचे शिवराय’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शिवशंभू विचार मंच मालवण आणि श्री शिवराज मंच मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे. २० जून रोजी मालवण शहर येथील दैवज्ञ भवन येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत या विशेष आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अन् पराक्रम दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. याच उद्देशाने ‘मुलांचे शिवराय’ या विशेष आणि आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉटेल रापण रियासत येथे पत्रकार घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी शिवशंभु विचारमंच तालुका संयोजक गणेश मेस्त्री, शिवशंभु विचारमंच आणि शिवराज भूषण महानाट्याचे संजय शिंदे, संकेत कु्वेसकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.

भुषण साटम म्हणाले, आजचे जग झपाट्याने प्रगती करत असून रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धा आणि अभ्यासाच्या दबावामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच फेसबुक, इंस्टाग्राम आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढत असून आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. ज्या उमलत्या वयात आजची काही पिढी दिशाहीन होताना दिसत आहे, त्याच म्हणजेच वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे अद्भूत कार्य सुरू केले होते. शिवरायांचा हाच जाज्वल्य पराक्रम आणि आदर्श बालमनावर बिंबवून त्यांच्यात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिवचरित्र समिती महाराष्ट्रचे सदस्य डॉ. अशोक बांगर, पंकज भोसले हे खास वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारच्या तीन ते सहा यावेळेत शिवराज्याभिषेकाचे महत्त्व, भारताच्या इतिहासात त्याचे काय परिणाम झाले. हा सोहळा कसा झाला हे या कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे.

या अभिनव सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे खास मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले शिवकालीन ऐतिहासिक बैठे खेळ आणि सांस्कृतिक खेळांचे प्रदर्शन होय. या खेळांविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले जाईल, जेणेकरून मोबाईलकडे अति झुकलेली आजची पिढी आपल्या समृद्ध इतिहासाकडे आणि मैदानी-ऐतिहासिक खेळांकडे आकर्षित होईल.

मालवण शहर आणि परिसरातील सर्व शालेय मुला-मुलींसाठी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.