एक महिलेला सुखरूप बाहेर काढले
खेड प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथे सोमवारी रात्री सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनामुळे एका घराचा काही भाग कोसळून घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले.

या दुर्घटनेत ७५ वर्षीय कल्पना शेलार यांना ग्रामस्थांच्या तत्पर मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर कळबणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार हे अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस तसेच महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही घरे धोकादायक स्थितीत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.













