पिंगुळी येथे ९ जुलैला मणक्याच्या आजारांवरील मोफत पूर्वतपासणी शिबिर

गरजू रुग्णांना ११ जुलै रोजी ओरोस येथील विशेष उपचार शिबिरात पाठविणार; प्रख्यात स्पाईन तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांचे मार्गदर्शन व तपासणी

कुडाळ :      बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगुळी येथील आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिक येथे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मणक्याच्या विविध आजारांवरील मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या पूर्वतपासणी शिबिरामध्ये तपासणी झालेल्या आणि उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित विशेष मणक्यांच्या आजारावरील मोफत तपासणी व उपचार शिबिरात पाठविण्यात येणार आहे.

या विशेष शिबिरासाठी देशातील प्रख्यात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज उपस्थित राहणार असून ते रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. भोजराज हे असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष तसेच द स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक आहेत. मणक्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मणक्यातील विकृती तसेच स्पायनल ट्युबरक्युलॉसिसवरील उपचार क्षेत्रात त्यांचा चार दशकांहून अधिक अनुभव असून त्यांनी १० हजारांहून अधिक मणक्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या आहेत. ते मुंबईतील लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटलसह अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत.

सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क (इंटरव्हर्टेब्रल डिस्क प्रोलॅप्स), सायटिका, स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी तसेच मणक्याशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या मोफत पूर्वतपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा श्रीमती आदिती पै तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

पूर्वतपासणी व नोंदणीसाठी रुग्णांनी आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिक, रवळनाथ प्लाझा, तळमजला, पिंगुळी येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी व पूर्वनोंदणीसाठी डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल (मो. ८२७०९७००६६) तसेच सौ. वैशाली ओटवणेकर (मो. ९८८१८८६६०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.