गोविंद सावंत विद्यापीठात दुसरा, तर उझेर शेख सातवा
कणकवली:सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी महाविद्यालय) येथील तंत्रशिक्षण अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्ष बी.ई. (२०२५-२६) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने ९३ टक्के निकाल नोंदवून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
आठव्या अंतिम सत्राच्या परीक्षेमध्ये वेंगुर्ला येथील कुमार गोविंद सावंत याने ९.२२ CGPI मिळवून मुंबई विद्यापीठात द्वितीय (दुसरा) आणि महाविद्यालयात प्रथम आनेचा बहुमान मिळवला. पिंगुळी (कुडाळ) येथील कुमार उझेर अब्दुल्ला शेख याने ८.९७ CGPI गुणांसह विद्यापीठात सातवा आणि महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला. तसेच चेंदवन (कुडाळ) येथील कुमार आशुतोष कवटकर याने ८.५० CGPI गुणांसह विद्यापीठात १४ वा आणि महाविद्यालयात तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या विभागातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या असून, ते संबंधित कंपन्यांमध्ये रुजूही झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, प्राध्यापकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे, उपाध्यक्ष आमदार निलेशजी राणे, सचिव नामदार नितेशजी राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी. एस. बाडकर आणि तंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन वंजारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












