अनधिकृत व्यक्तींमार्फत फॉर्म वाटप होत नसल्याचे स्पष्टीकरण!
मतदारांनी २९ जुलैपूर्वी गणना फॉर्म भरून जमा करण्याचे आवाहन.!
कणकवलीत राजकीय पक्ष व BLA यांची बैठक

कणकवली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत मतदारांना वितरित करण्यात येणारे गणना फॉर्म (Enumeration Form) केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फतच दिले जात असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीमार्फत फॉर्मचे वाटप केले जात नाही. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याचे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.
१ जुलै २०२६ पासून विशेष सखोल पुनरीक्षण अभियान सुरू झाले असून २९ जुलैपर्यंत प्रत्येक मतदाराला गणना फॉर्म वितरित केला जाणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कुटुंबातील सर्व सदस्यांचे फॉर्म दिले जात असून ते अचूक माहिती भरून २९ जुलैपूर्वी संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. फॉर्म भरून न दिल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीतील नावांबाबत आक्षेप अथवा चुकीने नाव वगळल्यास ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर १० ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयात तालुक्यातील राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला चार तालुकाध्यक्ष आणि २५ BLA उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावरील BLO यांनी BLA यांच्याशी समन्वय ठेवून कामकाज करावे, तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
कणकवली तालुक्यातील सर्व १३८ मतदान केंद्रांवर BLO स्वतः कामकाज पार पाडत असून त्यांच्या मदतीसाठी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही विशिष्ट BLO संदर्भात तक्रार असल्यास ती तहसील कार्यालयाकडे सादर करावी. त्यावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.













