▪️भात पीक शेती शाळेत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मणचे येथे आत्मा अंतर्गत नैसर्गिक शेती आधारित भात पिक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन शेती क्षेत्रावर करण्यात आले. याकरिता उप विभागीय कृषीअधिकारी कणकवली श्री.उमाकांत पाटील,मंडळ कृषी अधिकारी वाडा श्री. एस.एम.जाधव, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निकेतन राणे,सहाय्यक कृषि अधिकारी मणचे श्री. स्वप्निल तेली, होस्ट फार्मर श्री.राजेंद्र काडगे व इतर सर्व शेतकरी उपस्थित होते. या वर्गात श्री. एस.एम.जाधव यांनी भात लागवडीच्या विविध पद्धतींविषयी माहिती दिली व श्री पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करून श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी श्री.उमाकांत पाटील यांनी श्री पद्धतीने भाताची पुनर्लागवड, कृषिविभागाच्या योजना,यावर्षी उद्भवणारे अल निनोचे संकट इ. बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. सध्या भेडसावणाऱ्या भाताची रोप वाटिका पिवळी पडणे या समस्येवर पाहणी करून उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ▪️भवानी शेतकरी गटाकडून भातशेती लागवड – शेतकरी श्री. राजेंद्र काडगे यांनी आपल्यासोबत गावातील होतकरू शेतकरी श्री.प्रकाश रहाटे, सुनिल धाक्रस , अल्केश गुरव, भिमराज रहाटे, वैशाली लाड, सुरेश घाडी, साहिल घाडी, गजानन ढवळे, मुकेश काडगे,सचिन घाडी, विजय देवळेकर यांना एकत्र करून भवानी शेतकरी गट नावाने शेतकरी गटाची स्थापना केली आहे. या गटाने या वर्षी पाणी फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून सर्वांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचा निर्धार केला आहे. भवानी गटाच्या माध्यमातून एकत्र खते, बि -बियाणे खरेदी, पाणी फाऊंडेशनच्या डिजिटल शेतीशाळांमध्ये सहभाग घेणे, जीवामृत, दशपर्णी अर्क,गोकृपामृत यासारख्या सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती करून वापर करणे यासारखे उपक्रम राबवित आहेत. शेतकरी गटाला फार्मर कप स्पर्धेकरिता मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.













