गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केली घोषणा
सावंतवाडी:सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ४ आणि शाळा नंबर ५ या दोन्ही शाळा दत्तक घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली आहे. “माझे स्वतःचे शिक्षणही जिल्हा परिषद शाळेतच झाले असून, आज या शाळेतील मुलांनी मिळवलेले यश अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या मेहनतीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने व माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव या सोहळ्यात करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कौतुक सोहळ्याचे व बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव यांचा वाढदिवसही सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीसाठी कटिबद्धता दर्शवली. ते म्हणाले, “आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अनुकरण करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना कोणत्याही सोयी-सुविधांची कमी पडू दिली जाणार नाही. शाळांमधील शिक्षकांची रिक्त असलेली पदे लवकरच चांगल्या शिक्षकांमार्फत भरली जातील,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमात नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस आणि छावा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या सोहळ्याला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, मुख्याध्यापक महेश पालव, तसेच साईनाथ जामदार, शेलेस्तीन फर्नांडिस, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी उपस्थित होते. याशिवाय शाळेच्या शिक्षिका श्रीम. पूजा शिंदे, श्रीम. अनघा निरवडेकर, श्रीम. लक्ष्मी धारगळकर, श्रीम. अंजना घाडी, श्रीम. प्रणिती सावंत, श्रीम. दक्षता गवस, श्रीम. वर्षा नाईक, श्रीम. शिल्पा जाधव यांच्यासह इतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













