बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने एसी, रेफ्रिजरेशन व इलेक्ट्रॉनिक दुरुस्तीचे मोफत प्रशिक्षण

कुडाळ : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत व बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), सिंधुदुर्ग यांच्या वतीने एसी, रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती या विषयावरील ३० दिवसीय मोफत निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १० जुलै ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार असून स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या इच्छुक युवक-युवतींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणासाठी १८ ते ५० वर्षे वयोगटातील इच्छुकांनी ९ जुलै २०२६ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून नावनोंदणी करावी. अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती तसेच पासपोर्ट आकाराचा एक फोटो सादर करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजन, प्रशिक्षण साहित्य, शासनमान्य प्रमाणपत्र तसेच अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बीओआय स्टार सिंधुदुर्ग आरसेटी, तहसीलदार कार्यालयाजवळ, अँटी करप्शन कार्यालयासमोर, विठ्ठलवाडी येथे मो. ८२७५३६४७३६ संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या संचालकांनी केले आहे.