लांजा तालुका कुक्कुट व्यवसायिक सहकारी संस्थेत कृषी दिनानिमित्त वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न

लांजा (प्रतिनिधी): स्वातंत्र्यसेनानी स्व. शिवाजीराव सावंत लांजा तालुका कुक्कुट व्यवसायिक सहकारी संस्थेत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
भारत सरकारच्या सहकार मंत्रालया अंतर्गत सहकार सप्ताह आणि महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त या वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यसैनिक स्व. शिवाजीराव सावंत लांजा तालुका कुक्कुट व्यवसायिक सहकारी संस्थेच्या कार्यालय परिसरात AERF देवरुख संस्थेच्या सहकार्याने विविध देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात वृक्षलागवडीबरोबरच पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजात जनजागृती करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी करंज, रिंगी, अर्जुन, निव, आंबा, जांभूळ, चिरफळ, माड, शिरीष आणि कोकम यांची प्रत्येकी १० झाडे, तर बहावा, शेवर, जांभा, सीताअशोक, टेटू, फणस, बावळा, बकुळ, दासवन, केळवा, बेहडा यांची प्रत्येकी पाच झाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विवेक शिवाजीराव सावंत, संचालक सचिन भिंगार्डे, प्रविण जेधे, स्वप्ना सावंत, चंद्रप्रभा जंगम, चंद्रकांत शिंदे, विनय बुटाला तसेच संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सुमारे दोनशे विविध वृक्षांची लागवड या वेळी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.