हवालदार नंदू कांबळी यांच्यामुळे जीव वाचला : पुणे येथे उपचार सुरु
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरालगतच्या कापसाळ डिगेवाडी येथे मुंबई-गोवा हायवे क्रमांक ६६ वर नुकताच एक दुर्मिळ समुद्री पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. हा पक्षी लाल चोचीचा समुद्र पक्षी (रेड बिल्ड ट्रॉफीक बर्ड) असण्याची शक्यता असून तो किनारी किंवा खोल समुद्रात राहातो. हा पक्षी दिसताच हवालदार नंदू कांबळी व त्यांचा मुलगा आराध्य यांनी ताब्यात घेतले आणि तातडीने चिपळूण वन विभागाच्या स्वाधीन केले. त्यांच्या तत्परतेमुळे या दुर्मिळ पक्ष्याला वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या या पक्षावर पुणे येथे रेस्कू सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
हा दुर्मिळ पक्षी मुंबई-गोवा हायवे क्रमांक ६६ वर हवालदार कांबळी व त्यांचा मुलगा आराध्य असे चिपळूण बाजारपेठ जात असताना हा समुद्र पक्षी कापसाळ येथे रस्त्याच्या मध्यभागी जखमी अवस्थेत पडलेला होता. त्या पक्षाला उचलून त्यांनी घरी नेले, त्याच्यावर किरकोळ औषधोपचार करून पाणी पाजले. त्यानंतर वनरक्षक कृष्णा ईरामले यांना बोलावले. त्यांनी तत्परतेने वन खात्याची व्हॅन पाठवून त्या पक्षाला अधिक उपचारासाठी नेले. अधिक उपचारासाठी या पक्षाला पुणे येथे हलविण्यात आले आहे.
वन विभागाने पक्ष्याची तपासणी करून त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू केले असून, तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जखमी किंवा दुर्मिळ पक्षी अथवा वन्यप्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. स्वतः उपचार करण्याचा किंवा त्यांना पाळण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. हवालदार नंद कांबळी व आराध्य कांबळी यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या कृतीमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे. यापूर्वी दापोली, गुहागर व खरखते (चिपळूण) येथे मास्क्ड बुबी हे तीन समुद्र पक्षी आढळले होते.













