खेर्डी एमआयडीसीतील कचऱ्याच्या साम्राज्यावर ग्रामपंचायतीने ठोस निर्णय घ्यावा- अशोक पवार

स्मशानभूमीत कचरा, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
 भटक्या कुत्र्यांमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरानजीकच्या खेर्डी ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी परिसरात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. स्मशानभूमी परिसरात कचरा टाकला जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत असून, कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. या कुत्र्यांमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि एमआयडीसीमध्ये पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ‘खेर्डी स्वच्छ-सुंदर गाव’ अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी शासनमान्य भटक्या-विमुक्त जातीचे अशासकीय सदस्य अशोक पवार यांनी केली आहे.
एमआयडीसी परिसरात कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची ये-जा होत असताना काही ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी कचरा टाकला जाणे गंभीर बाब आहे. कचरा कुत्रे, गाई-गुरे रस्त्यावर ओढून आणत असल्याने रस्त्यावर कचरा पसरतो. त्यातून दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर तसेच एमआयडीसीमध्ये पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर ही कुत्री अंगावर धावून येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरात काम करणारे अनेक कामगार खेर्डी परिसरात भाड्याने राहत असून, काहीजण घरातील कचऱ्याच्या पिशव्या कामावर जाताना सोबत आणून रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचेही पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्मशानभूमीखालील पाइपलाइनचीही चौकशी आवश्यक एमआयडीसीतील एका कंपनीतून येणाऱ्या घाणेरड्या पाण्याच्या प्रश्नाकडेही पवार यांनी लक्ष वेधले. स्मशानभूमीच्या खालून पाइपलाइन टाकण्यात आली असून त्यातून पाणी वाहत असल्याचे सांगत या प्रकरणाची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका’ कचरा आणि सांडपाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत, एमआयडीसी प्रशासन, संबंधित उद्योग आणि ग्रामस्थांनी एकत्रित बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही अशोक पवार यांनी दिला. खेर्डी गाव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.