देवरूख नगरपंचायतीच्या प्रस्तावित करवाढीप्रश्नी आयोजित सभेत रणकंदन

सभा ठरली वादळी; सभेत जोरदार गदारोळ; नागरिकांचा हल्लाबोल

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पंचायतीच्या अवाजवी करवाढीच्या विरोधात देवरूखवासिय प्रचंड आक्रमक झाले असून देवरूख नगरपंचायतीच्या सभागृहात गुरूवारी आयोजित करण्यात आलेली प्रशासन आणि नागरिकांची संवाद सभा चांगलीच वादळी ठरली. करवाढीच्या मुद्द्यावर नागरिकांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. २०१६ मधील जुन्या ठरावाचा दाखला आणि त्यानंतर नगराध्यक्षांनी केलेल्या राजकीय भाषणामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापले.

​नगरपंचायतीने प्रस्तावित केलेल्या करवाढीबाबत गुरूवारी नागरिक आणि प्रशासनामध्ये थेट संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या सभेत सन २०१६ मधील एका ठरावाचा उल्लेख निघताच ठिणगी पडली. सन २०१६ मध्ये ‘करवाढ करू नये’ असा ठराव झालेला असताना, आता अचानक करवाढ कशासाठी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. यावरून प्रशासन आणि नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यातच नगराध्यक्षांनी विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत भाषण सुरू करताच उपस्थित नागरिकांचा संयम सुटला. हा नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा प्रश्न आहे, इथे राजकारण करू नका, असे म्हणत नागरिकांनी सभागृहात गदारोळ घालण्यास सुरुवात केली.

​प्रशासनाने करवाढीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त नागरिकांनी तो पार धुडकावून लावला. आधीच महागाईने होरपळत असताना नगरपंचायतीने लादलेली ही करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला. नगराध्यक्षांच्या राजकीय वक्तव्यांमुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली आणि घोषणाबाजीमुळे काही काळ सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. करवाढीवर तोडगा काढण्यासाठी बोलावलेली ही संवाद सभा, राजकीय भाषणबाजी आणि २०१६ च्या ठरावाच्या गदारोळातच वाहून गेली. आता प्रशासन नागरिकांच्या या तीव्र विरोधानंतर करवाढीचा निर्णय मागे घेणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, याकडे संपूर्ण देवरुखवासीयांचे लक्ष लागले आहे