स्वच्छता, अन्नसुरक्षा नियम व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी
कणकवली : शहरातील ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे आणि हॉटेल व्यवसायात अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध हॉटेलांची तपासणी केली. या तपासणीत स्वच्छता, परवाने, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे तसेच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची सखोल पडताळणी करण्यात आली.
ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे तसेच हॉटेल व्यवसायात अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने कणकवली शहरातील विविध हॉटेलांची तपासणी मोहीम राबविली. सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) सिंधुदुर्ग ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे यांनी ही तपासणी केली.
अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेलांची नियमित तपासणी केली जात असून, ग्राहकांकडून एखादी तक्रार प्राप्त झाल्यास तिची खातरजमा करून संबंधित ठिकाणी विशेष तपासणीही केली जाते.
तपासणीदरम्यान हॉटेलची रचना, परिसर व स्वयंपाकगृहातील स्वच्छता, आवश्यक परवान्यांची वैधता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे का, मालक व कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र उपलब्ध आहे का, याची सविस्तर पडताळणी करण्यात आली. तसेच अन्न तयार करताना व वाढताना कॅप, एप्रन आणि ग्लोव्हजचा वापर केला जातो का, याचीही पाहणी करण्यात आली.
याशिवाय काही खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा संशय आढळल्यास त्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात येत असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी हॉटेल चालकांना ग्राहकांसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले.












