▪️ पोईप हायस्कूलच्या गुणवंतांवर बक्षिसांचा वर्षाव; ३५ हून अधिक देणगीदारांकडून सव्वा लाखांची पारितोषिके!
*मसुरे | झुंजार पेडणेकर*
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोईप हायस्कूलची आज वेगळी ओळख निर्माण होत आहे. सर्वांचे सांघिक योगदान मिळत असल्याने पोईप हायस्कूलची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे. याप्रशालेत पोईप दशक्रोशीतून विद्यार्थी प्रवेश घेत असून यापूर्वी या प्रशालेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.यापूर्वी आपण या प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून पद भूषविले असून पोईप हायस्कूल साठी जिल्हा परिषद निधीतून विविध कामांसाठी निधी दिलेला आहे. यापुढेही पोईप हायस्कूलच्या शिल्लक भौतिक गरजांसाठी आपण कटिबद्ध राहू असे आश्वासन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जि. प. सदस्या सुमेधा पाताडे यांनी दिले.
पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे, संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, उद्योजक सुरेश नेरुरकर, संस्था सचिव विलास माधव, सत्यवान पालव, मोहन पांजरी, संदीप सावंत, कमलेश प्रभू, पंकज वर्दम, जितेंद्र परब, नितीन नाईक, राजाराम परब, आरटीओचे निरीक्षक रत्नकांत ढोबळे, मुख्याध्यापक विकास कुंभार, सहाय्यक शिक्षक- शिक्षिका, आदी मान्यवर उपस्थित होते. पोईप हायस्कूल प्रशालेतील मुलींसाठी अद्ययावत स्वच्छतागृह जिल्हा परिषद निधीतून देण्याचे सुमेधा पाताडे यानी जाहीर केले. या वेळी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी, तसेच एन.एम.एम.एस, स्कॉलरशिप, इंटरमिजिएट, व इतर तत्सम स्पर्धा परीक्षेतील उज्वल यश संपादन करून प्रशालेचे नाव लौकिक केलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या रोख रक्कम स्वरूपात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर म्हणाले, आज घडीला पोईप दशक्रोशीतून विद्यार्थी आपल्या प्रशालेत प्रवेश घेत आहेत. प्रशालेत येणारे विद्यार्थी व पालकांची मोठी अपेक्षा असून यांनी प्रशालेवर दाखविलेला विश्वास कधीही वाया जाणार नाही. प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व सहाय्यक शिक्षक यांना मागील वर्षीच्या दहावी-बारावी व इतर स्पर्धा परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन करून धन्यवाद दिले. पोईप दशक्रोशीतील सुमारे 35 हून अधिक दानशूर देणगीदारांनी दिलेल्या ₹1,01,370 रोख रक्कमेच्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यावेळी एस एस सी बॅच सन 2005 मधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक वर्ग खोली बांधून दिल्याबद्दल माजी विद्यार्थी राजाराम परब, संतोष मुणगेकर, नयन माधव, बबलू वेंगुर्लेकर, सौ. पाताडे, व इतर विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी निमंत्रित आरटीओचे निरीक्षक रत्नकांत ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोटर परिवहन विभागाच्या विविध नियमान बाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी वाहन चालविण्याचे नियम व माहिती आरटीओ विभागाकडून याबाबत पुस्तिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. सन 2025-26 साठी प्रशालेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रशालेतील आदर्श विद्यार्थी म्हणून रिया घाडीगावकर, हुशार व होतकरू विद्यार्थी म्हणून श्रवण परब, आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू महाजनी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विठोबा माधव, तसेच योगा पदविका अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण दिल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका केतकी सावंत, ऋतुजा राऊळ, शिक्षक संतोष तावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच राकेश परब यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. लवकरच पोईप हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी दत्ता सामंत यांच्या वतीने 100 सायकलचे वाटप करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू महाजनी व केतकी सावंत, प्रास्ताविक विकास कुंभार, तर आभार प्रसाद चव्हाण यांनी व्यक्त केले.












