उड्डाणपुलाखाली जागांची निश्चिती सुरू
कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने अनेक दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी पुन्हा सुरू केली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागांची निश्चिती करण्यात येत असून, भाजी, फळ व फुल विक्रेत्यांना प्राधान्याने जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर स्टॉलधारकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर कणकवली नगरपंचायतीने शुक्रवारी पुन्हा सुरू केली आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे पथक उड्डाणपुलाखाली दाखल होऊन जागांची निश्चिती करण्याचे काम हाती घेतले आहे.
विशेषतः आप्पासाहेब पटवर्धन चौक परिसरात मोठ्या संख्येने भाजी, फळ, फुल विक्रेते तसेच अन्य स्टॉलधारक व्यवसाय करतात. सध्या उड्डाणपुलाखाली भाजी, फळ व फुल विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देण्यात आली असून त्यांच्यासाठी शहरातील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखाली जागांची निश्चिती करण्यात येत आहे.
या विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यासच इतर स्टॉलधारकांना व्यवसायासाठी परवानगी देण्यात येईल, असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी संबंधितांना स्पष्ट केले. त्यामुळे अनेक स्टॉलधारकांमध्ये संभ्रम आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा वेग आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नगरपंचायतीची कारवाई सुरू आहे.













