मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम: राजापुर तालुक्यातील देवाचे गोठणे बुरंबेवाडी मतदान केंद्राचे १०० टक्के काम पुर्ण

राजापूर(प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ‘विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेत चिपळूण पाठोपाठ राजापूर तालुक्याने बाजी मारली आहे, राजापूर 267 राजापूर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारे राजापुर तालुक्यातील देवाचे गोठणे बुरंबेवाडी मतदान केंद्र पहिले गाव (मतदार यादी भाग) ठरले आहे. तशी माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे.
राजापूर तालुक्यामध्ये सदरचे काम हे युध्द पातळीवर सुरु आहे. त्याबाबात मतदान केंद्रस्तरीय अधिका-यामार्फत घरोघरी भेटी कार्यक्रम दिनांक 30/06/2026 ते 29/07/2026 पर्यंत मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित करुन दिलेला आहे. सदरचा कार्यक्रम हा कालबध्द आहे. 267 – राजापूर विधानसभा मतदार संघामधील केंद्र क्रमांक 294 देवाचे गोठणे बुरंबेवाडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) समिधा संतोष बावकर, अंगणवाडी सेविका यांनी सदरचा कार्यक्रम 267 – राजापूर विधानसभा मतदार संघातून सर्वप्रथम यशस्वीरीत्या पुर्ण केला आहे. याबाबत त्यांचे विशेष कौतुक विश्वजीत गाताडे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, राजापूर विकास गंबरे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार राजापूर, श्रीम. एम. व्ही. शेळके, निवडणूक नायब तहसिलदार, राजापूर व श्रीम. राधीका प्रभूघाटे, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक यांनी केले आहे.
देवाचे गोठणे बुरंबेवाडी मतदान केंद्र क्रमांक २९४ या मतदान केंद्रातील एकूण २१५ मतदारांपैकी २१५ मतदारांना अर्जाचे वाटप करण्यात आले. यातील २१० अर्जांचे यशस्वी डिजिटलायझेशन करण्यात आले. राजापुर तालुक्यातील या मतदान केंद्रारवरील मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) काम १०० टक्के पुर्ण झाले आहे.