जि. प. स्वनिधीतून शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळावी 

जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आपल्या मतदारसंघातील प्रलंबित शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती कामांना प्राधान्याने मंजुरी मिळावी, याकडे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी सभापतींना निवेदन देऊन आवश्यक निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

विक्रमादित्य सावंत यांनी दिलेल्या निवेदनात मतदारसंघातील विविध शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजगाव हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ चे छप्पर, खिडक्या व दरवाजांची दुरुस्ती करणे, तसेच माजगाव नाईकवाडा महापुरुष विद्यामंदिर शाळा नंबर ४ येथे लाईट फिटिंगसह दरवाजे आणि खिडक्यांची दुरुस्ती करण्याच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय जि. प. शाळा चराठे वझरवाडी येथे नवीन शौचालय बांधकाम व जुन्या शौचालयाची दुरुस्ती, आणि ओटवणे जिल्हा परिषद शाळा नंबर ३ गवळीवाडी येथील इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे माजगाव आरोग्यवर्धिनी केंद्रातील स्नानगृह, शौचालय, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती, ओटवणे जिल्हा परिषद शाळा नंबर ४ ची दुरुस्ती, सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर २ ची दुरुस्ती, सरमळे देऊळवाडी नंबर १ जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, माजगाव जिल्हा परिषद शाळा नंबर २ च्या इमारतीचा स्लॅब दुरुस्त करणे, आणि ओटवणे जिल्हा परिषद शाळा नंबर २ मांडवफातरवाडी येथील छपराची दुरुस्ती करणे या कामांकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व आरोग्य केंद्राच्या सुविधा सुरळीत चालण्यासाठी जि. प. स्वनिधीतून ही सर्व कामे प्राधान्याने मंजूर करावीत, अशी मागणी सावंत यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.