सावंतवाडीच्या ‘इनरव्हील क्लब’चा माणगाव येथे स्तुत्य उपक्रम

शेतीच्या बांधावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद

सावंतवाडी :कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे सावंतवाडी येथील ‘इनरव्हील’ या महिलांच्या सेवाभावी संस्थेमार्फत शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देणे, बांधावर जाऊन वास्तवता जाणणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे असा त्रिवेणी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी जिव्हाळापूर्ण संवाद साधला. या ग्रुपमध्ये प्रामुख्याने सौ. नीना कशाळीकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, सौ. अनिता भाट, सौ. शकुन म्हापसेकर, सौ. रिया रेडीज, सौ. ममता पाटणकर, सौ. उल्का डिसूझा, सौ. मीनल नाईक, सौ. साधना रेगे, सौ. प्रज्ञाली ढेरे, सौ. भारती देशमुख, सौ. देवता हावल, सौ. डॉ. नेत्रा सावंत आणि सौ. दर्शना देसाई यांचा समावेश होता.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या महिला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असतात. गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, गरीब शाळकरी मुलींना सायकल वाटप, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे व परिसंवाद आयोजित करणे, तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि गांडूळ खतांचे वाटप करणे आदी सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे म्हणाल्या, “शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून आपला बळीराजा शेतात राबून १४० कोटी जनतेची भूक भागवतो. शेतात काम करताना काय कष्ट सोसावे लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. शहरात आम्हाला सर्व धान्य, भाजीपाला, फळे बाजारात विकत मिळतात; पण त्या वस्तू कशा पिकवल्या जातात, हे जाणून घेण्याची ही धडपड आहे. येथील निसर्गरम्य परिसर पाहून पृथ्वीवरच्या स्वर्गाची अनुभूती आली. कोकणचे सौंदर्य अबाधित राखायचे असेल तर पर्यावरण रक्षण गरजेचे आहे. येथील फेसाळणारे समुद्रकिनारे आणि डोंगर-दर्‍यांनी नटलेला सह्याद्री हा कोकणचा आत्मा आहे. जर आपण पर्यावरण रक्षणाबाबत जागृत राहिलो नाही, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणूनच भविष्यात वृक्ष संवर्धनासाठीही इनरव्हील ग्रुप प्रयत्न करणार आहे.” या भेटीदरम्यान संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय व गांडूळ खतांचे वाटप करण्यात आले.

शहरी भागातून आलेल्या या सुशिक्षित महिलांना आपल्या बांधावर पाहून आणि आपल्या कष्टाची जाण ठेवून कोणीतरी दाद देत असल्याचे पाहून स्थानिक शेतकरी भारावून गेले व त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन श्री. अवि राणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश भिसे आणि श्री. गुरु पालकर प्रामुख्याने उपस्थित होते.