मुंबई :
मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण विभाग आणि डी. बी.जे. महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ व्या युवा महोत्सवानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी विभागातील ३६ महाविद्यालयातील ३९ प्राध्यापक आणि ११० विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
५९ व्या युवा महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास न. ए. सोसायटीचे व्हाइस चेअरमन मा. श्री. दीपक विखारे, डी. बी. जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट, रजिस्ट्रार श्री. विजयेंद्र जाधव, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. संतोष मराठे, डॉ. राजेश राजम, अमोल बावकर आणि डॉ. राहुल पवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रसंगी दीपप्रज्वलन, नटराज पूजन, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस वंदन करून आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
मुंबई विद्यापीठ आयोजित सांस्कृतिक युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर अर्थार्जनासाठी सुद्धा सक्षम बनवतो. युवा महोत्सवाने आज पर्यंत अनेक दिग्गज कलाकार आणि उत्तम माणूस घडवले असे प्रतिपादन करत श्री. निलेश सावे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. डी. बी. जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. तर मा. डॉ दिलीप विखारे यांनी अध्यक्षीय भाषण केले. औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाचे आभार डॉ. राहुल पवार यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कार्यशाळेस मयूर मगरे, तुषार शिरसाट, साहिल जोशी, मानस साखरपेकर, अमोल बावकर आणि निलेश सावे सर यांनी साधन व्यक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पिसे यांनी केले. सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
Home महत्वाच्या बातम्या डी.बी. जे. स्वायत्त महाविद्यालयात जिल्हा स्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाची कार्यशाळा संपन्न












