तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने जामिनावर सुटका झाल्यानंतर सहा जणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्याकांडात त्याची पत्नी, लहान मुले आणि एका जुन्या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पॉक्सो प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर घेतला बदला
रंगारेड्डी : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडल परिसरात एका तरुणाने सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, राजकुमार नावाच्या 28 वर्षीय तरुणावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर राजकुमार जामिनावर बाहेर आला. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सूडाच्या भावनेने पेटून उठल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने सहा जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.
पत्नी, मुलांसह सहा जणांची हत्या; आरोपीचा शोध सुरू
या हत्याकांडात पॉक्सो प्रकरणातील पीडित मुलगी, तिची आई, तिची आजी, आरोपीची पत्नी आणि त्याची दोन लहान मुले यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा प्रकार केल्याचा आरोप असून घटनेनंतर तो फरार झाला आहे.
फरार होताना राजकुमारने आपल्या आईला फोन करून सहा जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.
सहा जणांच्या हत्येच्या घटनेमुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तरुण जोशी आणि योगेश गौतम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी विशेष पथके तैनात केली असून फरार आरोपीला अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.











