मोकाट गायीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; गायीच्या मालकावरही होणार कारवाई
देवगड | प्रतिनिधी : देवगड-जामसंडे मार्गावर मोकाट गायीमुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी घडली. या प्रकरणाचा तपास देवगड पोलिसांकडून सुरू असून, संबंधित गाय मोकाट सोडणारा मालक दोषी आढळल्यास त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद शामराव घाडी (वय ४७, रा. तळवडे घाडीवाडी, ता. देवगड) हे शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकी (क्र. MH-07-AQ-0365) घेऊन देवगडहून जामसंडेकडे जात होते. यावेळी डॉल्फिन बिअर शॉपीसमोरील देवगड-नांदगाव मार्गावर अचानक एक गाय रस्त्यावर आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची गायीला जोरदार धडक बसली.
या धडकेमुळे मिलिंद घाडी यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताबाबत देवगड पोलीस ठाण्यात तपास सुरू असून, संबंधित गाय कोणाच्या मालकीची आहे आणि ती मोकाट का सोडण्यात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. तपासात संबंधित मालक दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी स्पष्ट केले आहे.













