अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेला गंडा
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
नागपुरात भोंदू ज्योतिषाने देवाच्या कोपाची भीती दाखवत एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दैवी शक्ती असल्याचा बनाव करून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून चलाखीने पिशवीची अदलाबदल करत दागिने व मोबाईल लंपास केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या फसवणुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नागपूर : राज्यात यापूर्वीही भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक आजही अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूरमध्ये घडलेल्या ताज्या घटनेत एका महिलेला देवाच्या कोपाची भीती दाखवत सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भोंदू ज्योतिषांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैद्यकीय चौकाजवळ हा प्रकार घडला. सुजाता भगवानलाल अगरवाल या पायी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांनी स्वतःला ज्योतिषी असल्याचे सांगत, देवाचा कोप तुमच्या कुटुंबावर असून तुमची आई गंभीर आजारी असल्याचे भाकीत केले. हा प्रकोप दूर करायचा असेल तर हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील सोन्याची साखळी पिशवीत ठेवण्यास सांगण्यात आले.
आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुजाता अगरवाल यांनी सुमारे चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची साखळी पिशवीत ठेवल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांना डोळे बंद करून ५० पावले मागे चालत जा आणि मागे वळून पाहू नका, अशी सूचना केली. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी पिशवीची अदलाबदल केली आणि दागिने व इतर साहित्य घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
काही वेळानंतर पिशवी उघडून पाहिल्यावर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ इमामवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.










