सावंतवाडीत ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ च्या विजेत्या कलाकारांचा नगर परिषदेकडून विशेष गौरव

सावंतवाडी:”सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी असून या नगरीला मोठा कला वारसा लाभला आहे. ‘सम्राटं इंटरनॅशनल क्लब’च्या माध्यमातून संगीत व संस्कृती जपण्याचे स्तुत्य काम होत असून, भविष्यात अशा उपक्रमांना नगर परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असा शब्द उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिला. येथील ‘पर्णकुटी विश्रामगृह’ येथे आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते.

गोवा-मये येथील सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या अंतर्गत नव्याने स्थापन होत असलेल्या ‘सम्राट क्लब सावंतवाडी शहर’च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तीन राज्यांतून झालेल्या संगीत स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत कलाकारांचा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शाही सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा मुख्य विजेता हर्ष नकाशे, प्रथम फेरीतील विजेती कु. पल्लवी पिळणकर (माणगाव), प्रथम फेरीतील विजेता साहिल देसाई (मणेरी) आणि गतवर्षीची ‘संगीत सितारा’ विजेती श्रुती सावंत यांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविकात मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी क्लबच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘संगीत सितारा’ विजेतेपदाचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

या दिमाखदार सोहळ्याला मालवणी कवी दादा मडकईकर, सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, आगामी सम्राट क्लब सावंतवाडीचे पदाधिकारी नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, ॲड. सौ. सिद्धी परब, सौ. स्मिता केंकरे, पत्रकार प्रा. रूपेश पाटील, सज्जन बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अर्जुन नाईक यांनी, सूत्रसंचालन आशुतोष चिटणीस यांनी केले, तर सुनील राऊळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी संगीतप्रेमी व रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.