कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांचा अरुण उर्फ आण्णा कदम यांनी घेतला आढावा

खेड | प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम यांनी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील विविध विभागांना भेट देत वैद्यकीय सेवा, औषधसाठा, स्वच्छता, मनुष्यबळ आणि उपचार व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, औषधांचा पुरेसा साठा आहे का, उपचार प्रक्रियेत कोणत्या अडचणी येत आहेत, तसेच नागरिकांच्या तक्रारी व अपेक्षा याबाबत अरुण उर्फ आण्णा कदम यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर, दर्जेदार आणि संवेदनशील आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, कर्मचारी उपलब्धता आणि उपचार व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, आरोग्य केंद्रातील प्रलंबित आवश्यक बाबी तातडीने पूर्ण व्हाव्यात आणि कोणत्याही रुग्णाला उपचारांअभावी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या भेटीदरम्यान विभाग प्रमुख सुनील पवार, पंचायत समिती सदस्य निसार जाफर सुर्वे, अंकिता शिगवण, दिनेश पाष्टे, डॉ. अमोल जोंधळे, परिचारिका सौ. हुमणे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी अशा पाहणी दौऱ्यांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.