खेड / प्रतिनिधी :
आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यातून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे वारकरी बंधू-भगिनींच्या सेवेसाठी आयोजित कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम तसेच शिवसेना राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी सहभाग घेतला. यावेळी दोघींनी वारकऱ्यांसोबत पायी चालत त्यांची भेट घेत आत्मीय संवाद साधला.
टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या अखंड गजरात श्रेया योगेश कदम यांनी वारकरी बंधू-भगिनींची विचारपूस करत त्यांच्या वारीतील अनुभव जाणून घेतले. विशेषतः महिला वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांच्या साधेपणाची आणि सेवाभावी भूमिकेची वारकरी समाजातून प्रशंसा करण्यात आली.
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रेया योगेश कदम यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी साधलेला थेट संवाद उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.
अनेक महिला वारकऱ्यांनी श्रेया कदम यांच्याशी मनमोकळा संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा असल्याचे श्रेया योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जिवंत वारसा असून त्यांच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे हडपसर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.













