गायिका जास्मिन सँडलसने चाहत्यांना दिला मोठा सरप्राईज; मैफिलीत मंगेतराची केली अधिकृत ओळख

#

दिल्लीतील लाइव्ह शोमध्ये जास्मिन सँडलसची खास घोषणा
शेखर चौधरीसोबतच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब

पंजाबी गायिका जास्मिन सँडलस हिने दिल्लीतील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान आपल्या चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शेखर चौधरी यांची तिने स्टेजवर अधिकृतपणे आपला मंगेतर म्हणून ओळख करून दिली. यावेळी तिने हातातील हिऱ्याची अंगठीही सर्वांना दाखवली. या खास क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


नवी दिल्ली : पंजाबी गायिका जास्मिन सँडलस हिने तिच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या पहिल्याच कार्यक्रमात चाहत्यांना अनपेक्षित आनंद दिला. दिल्लीतील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान तिने शेखर चौधरी यांची सर्वांसमोर आपला मंगेतर म्हणून ओळख करून दिली. यावेळी तिने हातातील एंगेजमेंट रिंग दाखवत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली.

जास्मिन सँडलस आणि शेखर चौधरी यांचे नाते यापूर्वी सार्वजनिक झाले नव्हते. मात्र, तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट, प्रवासाचे व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांमध्ये शेखर तिच्यासोबत दिसत असल्याने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले होते. कॉन्सर्टच्या बॅकस्टेजमध्येही तो ‘टीम सँडलस’ असा टी-शर्ट घालून तिच्यासोबत दिसला होता.

अलीकडेच जास्मिन उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळीही शेखर चौधरी तिच्यासोबत असल्याचे अनेक व्हिडिओंमध्ये दिसून आले होते. मात्र, दोघांनीही त्यावेळी आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.

दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान स्टेजवर शेखर चौधरी आल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. त्यावेळी जास्मिन सँडलस म्हणाली, “हा तो व्यक्ती आहे ज्याने मला ही अंगठी घातली आहे. हा माझा माणूस आहे.” त्यानंतर ती त्याच्याकडे धावत गेली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारत प्रेम व्यक्त केले. शेखरनेही स्टेजवर तिचे चुंबन घेताच सभागृहात टाळ्या आणि जल्लोषाचा कडकडाट झाला.

सध्या सोशल मीडियावर या खास क्षणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेखर चौधरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नसली, तरी या अधिकृत घोषणेनंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रेमकथेची उत्सुकता आणखी वाढली आहे.