राजापुरात कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभाराची लक्तरे वेशीवर

कृषी दिनाच्या कार्यक्रमाला अवघे पाच शेतकरी

भाजपा जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव यांच्याकडून कृषी विभागाच्या कामाचा पंचनामा

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुका कृषी विभाग कायमच चर्चेत राहिला आहे. हा विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी की अहितासाठी असाच प्रश्न अनेकांना पडतो. शहरापासून दूर असलेले कार्यालय आणि शेतकऱ्यांना होणारा मनस्पात नित्याचेच झाले आहे. तर या विभागाकडून शेतकऱ्यांसाठीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नसल्याच्या तक्रारीही वारंवार होत आहेत. अशापच १ जुलै कृषी दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरिय शेतकरी मेळाव्याचे योग्य पध्दतीने नियोजन न केल्याने या मेळाव्याला अवघे पाचच शेतकरी उपस्थित असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

खुद्द सभापती नंदीनी कदम यांच्याच विभागात झालेल्या या मेळाव्यात ही परिस्थितीत दिसून आल्याने पदाधिकाऱ्यांचे प्रशासनावर वजन नसल्याचेही दिसून आले आहे. नियोजनाअभावी पुरत्या फसलेल्या या शेतकरी मेळाव्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर आली आहेत. या प्रकरणी उपसभापती अभिजित गुरव यांनी शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत या विभागाला चांगलेच धारेवर धरले व जाब विचारला.

राजापूर तालुक्यातील वाडापेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला अवघे पाच शेतकरी उपस्थित होते. याबाबत उपसभापती अभिजित गुरव यांनीच या मासिक सभेत माहिती दिली. यावेळी पंचायत समितीच्या सभेत कृषी विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या मासिक आढावा बैठकीत कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा सुरू असताना उपसभापती अभिजित गुरव यांनी वाडापेठ येथे झालेल्या कृषी दिन कार्यक्रमाबाबत माहिती मागितली. यावेळी त्यांनी तालुकास्तरीय कार्यक्रमाला केवळ पाच शेतकरी उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आणून देत, तालुक्यात हजारो शेतकरी असताना त्यांच्यापर्यंत कार्यक्रमाची माहिती का पोहोचली नाही, असा सवाल उपस्थित केला.

यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाबाबत सर्व ग्रामपंचायतींना पूर्वसूचना दिल्याचे सांगितले. मात्र, सूचना देण्यात आल्या असतील तर शेतकऱ्यांची उपस्थिती इतकी अल्प का राहिली, असा प्रतिप्रश्न उपसभापती गुरव यांनी केला.

कृषी दिन हा शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा व्यापक सहभाग अपेक्षित असतो. मात्र, कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने माहितीच्या प्रसारात आणि नियोजनात त्रुटी राहिल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.

या प्रकारामुळे तालुका कृषी विभागाच्या जनसंपर्क व कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा शासकीय कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करून अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याची गरज सभेत व्यक्त करण्यात आली.