राजापुरातील शासकीय कार्यालयांत कामकाजाच्या वेळापत्रकाला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हरताळ

कधीही या आणि कधीही जा अशी सुरू आहे मनमानी

राजापूर : प्रतिनिधी शासकिय कार्यालयांतील कामकाजाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित केलेली असताना राजापूर तालुक्यातील काही शासकीय कार्यालयांमध्ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असून, निर्धारित वेळेपूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचा प्रकार नियमित सुरू असून याबाबत कोणीच विचारत नसल्याने काही अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी सुरूच असल्याचेही पुढे आले आहे. तर शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या नोकरीच्या स्थानी मुख्यालयी रहाणे बंधनकारक असतानाही ९५ टक्के अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयात रहात नसल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत.

याचा फटका विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामन्य जनतेला बसत असून अनेकदा साहेब नाहीत, त्या टेबलवरिल अधिकारी व कर्मचारी नाही या कारणांमुळे कामेच होत नसल्याच्या जनतेच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि राजापुरातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला आळा घालावा अशी मागणी होत आहे.

राजापुर तालुक्यात अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी हा नित्याचाच विषय झाला आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे नसलेले वर्चस्व व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात असलेली पाठराखण यामुळे काही अधिकारी व कर्मचारी हे मनमानी करत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत.

तालुक्यात महसूल, पंचायत, कृषी आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही काही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. सकाळी कार्यालयाची वेळ ही ९.४५ असताना अनेक कर्मचारी १० ते १०.३० नंतर कार्यालयात उगवत आहेत. तर सायंकाळी कार्यालय सुटण्याची वेळ ही ६.१५ असताना अनेक अधिकारी व कर्मचारी हे पाच ते साडेपाच वाजताच निघून जात आहेत. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने शुक्रवारी तर दुपारनंतर सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळतो अशी राजापुरात परिस्थिती आहे. पंचायत समिती, महसुल प्रशासनातील अनेक कर्मचारी सायंकाळी ५.३० वाजता एका खासगी गाडीने आपापाल्या घरी रवाना होतात. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातुन येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारीही आपल्या खालच्या अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारत नसल्याने ही मनमानी सुरूच आहे.

ग्रामीण भागातून लांबचा प्रवास करून येणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन व्हावे, उपस्थितीची नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

याबाबत आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

बायोमॅट्रीक हजेरीलाही कुणी जुमानेना

काही कार्यालयांमध्ये बायोमॅट्रीक हजेरी प्रणालीचा वापर केला जातो. शासनाचे तसे निर्देश आहेत. मात्र यालाही कुणी जुमानत नाही अशी अवस्था आहे. या बायोमॅट्रीक हजेरी यंत्रातही फेरबदल करता येतो अशीही चर्चा सुरू असून काही कार्यालयांमध्ये ही बायोमॅट्रीक हजेरी प्रणालीही नसल्याचे पुढे आले आहे.

मुख्यालयात रहाण्याच्या नियमांनाही राजापुरात हरताळ

शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी कामकाज करता त्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयी रहाणे अधिकारी व कर्मचारी यांना बंधनकारक आहे. पावसाळयात आपत्ती काळात तर मुख्यालय सोडू नये असे शासनाचे कडक आदेश आहेत. मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयात रहातच नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. राजापूर प्रांताधिकारी, राजापूर तहसीलदार हे मुख्यालयी रहात आहेत. मात्र गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी रहात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे मनमानी करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोण आवरणार असा खडा सवाल जनतेतुन उपस्थित केला जात आहे.