मुलीच्या बारश्याआधीच आईने संपवले जीवन…

सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल…

एका महिन्याची चिमुकली आईविना पोरकी…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापुर: शहरातील राजारामपुरी येथे एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता यांचे माहेर (लाटगाव, ता.आजरा)असून त्यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. वर्षापूर्वी त्यांचे राजारामपुरीतील सायबर चौक येथे राहणाऱ्या प्रतिकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले होते. एक महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली दोनच दिवसात मुलीला एक महिना पूर्ण होत असल्याने घरात तिच्या बारशाची तयारी सुरू होती.पण अस्मिताने टोकाचे पाऊल उचलल्याने एक महिन्याची चिमुकली आईविना पोरकी झाली.

अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे.

लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी ५३ हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबीयांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला, असा आरोपही अस्मिताच्या आई-वडिलांनी केला. या आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती प्रतिकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर अशा चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू, सासरे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.