शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार याचा प्रताप, लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील हर्चे शाखा डाकघरात ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद समीर सूर्यकांत बेल्हेकर, वय ३६, डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग लांजा, राहणार लांजा वैभव वसाहत) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. हर्चे येथील शाखा डाकघरात कार्यरत असताना जयप्रकाश यशवंत पवार (वय ५१,
रा. हर्चे, बौद्धवाडी) यांनी पोस्टाचे खाते उघडण्यासाठी ग्राहकांकडून स्वीकारलेली रक्कम सरकारी दस्तऐवजात नोंदवली नाही. २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ८,२०,१५२ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ५,३०,१५२ रुपये ही कायमस्वरूपी रक्कम, तर २,९०,००० रुपये ही तात्पुरती रक्कम असा एकूण ८,२०,१५२ रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी रात्री २१.१९ वाजता लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.













