सह्याद्री बॅडमिंटन क्लबच्या उपक्रमाला १५० खेळाडू व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण (वार्ताहर) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने सह्याद्री बॅडमिंटन क्लब अंतर्गत बॅडमिंटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विविध खेळांची गोडी लागावी, त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत प्राविण्य मिळवून सह्याद्री शिक्षण संस्थेसह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, या उदात्त हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन सई निकम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मिरा जोशी, प्राथमिक शाळा सावर्डेचे मुख्याध्यापक शकील मोडक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू व एन.आय.एस. प्रशिक्षक मयूर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन खेळातील मूलभूत तंत्र, योग्य ग्रिप, फुटवर्क, सर्व्हिस, स्मॅश, कोर्टवरील हालचाली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून खेळातील विविध कौशल्ये समजावून सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित सराव, चिकाटी आणि शिस्त यांच्या बळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी पालकांनाही आवाहन करताना सांगितले की, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेलाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक वेळ, सुविधा आणि सकारात्मक पाठबळ दिल्यास ते क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. या कार्यशाळेला परिसरातील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत सुमारे १५० खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेत विविध कौशल्यांचा प्रत्यक्ष सराव केला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे आणि प्रशांत सकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यशाळेचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.













