रत्नागिरी जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तीन गाड्यांवर देवरुख पोलिसांची कारवाई;

रत्नागिरी प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीर आणि निर्घृण वाहतूक करणाऱ्या तीन वेगवेगळ्या गाड्यांवर देवरुख पोलिसांनी केली कारवाई; जनावरांची सुटका
​रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर आणि अत्यंत निर्घृणपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन वेगवेगळ्या वाहनांवर देवरुख पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पहिली कारवाई रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील साखरपा तळवाडी येथे करण्यात आली, जिथे एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीतून (क्र. MH08-BK-0575) दोन म्हशींना अत्यंत दाटीवाटीने, मानेला दोरीने बांधून वाहनाचा हौदा चारही बाजूंनी बंद करून नेले जात होते. या वाहतुकीदरम्यान एका म्हशीचे शिंग मोडून ती जखमी झाली होती. याच महामार्गावर साखरपा तळवाडी येथेच दुसऱ्या एका कारवाईत, दुसऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीतून (क्र. MH08-AP-1211) दोन गायींची अशीच अमानुषपणे आणि कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा परवाना नसताना वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
​दरम्यान, अशीच तिसरी कारवाई संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीनगर तिठा (साडवली) येथे करण्यात आली. या ठिकाणी एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीतून (क्र. MH.12/EQ 9627) चार बैलांना कोणतीही पूर्वतयारी, चारा-पाण्याची सोय किंवा प्रथमोपचार किट न ठेवता, श्वास घेण्यासही त्रास होईल अशा दाटीवाटीने भरून नेले जात होते. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी वाहनांसह जनावरे ताब्यात घेतली असून, जनावरांना वेदना व इजा होईल अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकांवर व त्यांच्या साथीदारांवर देवरुख पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.