दापोली | प्रतिनिधी : दापोली शहरातील बाजारपेठ परिसरात चोरट्याने एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर दुकाने व एक घर फोडले. मंगळवारी (दि.१६) पहाटे 4.20 च्या सुमारास चोरट्यांनी दापोली बाजारपेठेमधील सेंट्रल मेडिकलवर डल्ला मारला. ठिकाणी काउंटरमधील रक्कम लंपास केली. तर मेडिकलच्या बाजूला असणाऱ्या तांबडे टेलर दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला.
त्या ठिकाणी काहीही हाती न लागल्यामुळे शिवून ठेवलेले कपडे घालून बघण्याचा प्रयत्न केला. परंतु मापाचे कपडे नसल्याने ते कपडे तसेच अस्ताव्यस्त टाकून चोरट्यांनी पलायन केले. प्रभूआळी येथील राम मंदिराशेजारी असणारे प्रधान यांच्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला. प्रधान हे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांच्या घरातून कोणते साहित्य, मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे समजू शकलेले नाही.











