सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कसबा येथील संभाजी महाराज स्मारकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी
देवरूख (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या प्रस्तावित जागेची बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे यासाठी विशेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पाहणी दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी स्मारकाचा प्रस्तावित आराखडा आणि त्याचे डिजिटल सादरीकरण (प्रेझेंटेशन) अतिशय बारकाईने पाहिले. या स्मारकाच्या उभारणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यावेळी अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार प्रमोद जठार, प्रशांत यादव, राजेंद्र महाडिक, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, वैभव खेडेकर आणि डॉ. अमित ताठरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामाची गती पाहण्यासाठी मी स्वतः येथे आलो आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक ठरेल असे हे भव्य स्मारक लवकरच पूर्ण होईल. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा ठरणार असल्याने शासन याकडे विशेष लक्ष देत आहे.
ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)













