खेड (प्रतिनिधी) : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ग्रंथालय विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी तसेच सर्जनशील विचारांना चालना मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेसाठी “वाचन सर्जनशीलता आणि ज्ञानाची गुरुकिल्ली” तसेच “वाचनाच्या माध्यमातून भविष्याला आकार देणे” असे दोन विषय देण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून १००० शब्दांपर्यंत हस्तलिखित निबंध तयार करून त्याची पीडीएफ प्रत किंवा मूळ प्रत आयोजकांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील ११ कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्राप्त निबंधांचे परीक्षण करून उत्कृष्ट निबंधांची निवड करण्यात आली. यामध्ये कालुस्ते हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शईजान दस्तगिर शेख याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख १५०० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच फुरूस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पौर्णिमा चंद्रकांत केतकर हिने द्वितीय क्रमांक मिळवित रोख १००० रुपये व प्रमाणपत्र प्राप्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य सचिन पाटील, रजिस्ट्रार संदीप मुंनघाटे, ग्रंथालय समितीचे चेअरमन घारे सर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












