वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे दोडामार्ग येथे विद्यार्थ्यांना आवाहन
दोडामार्ग: प्रतिनिधी
“मी स्वतः कोणत्याही अकॅडमीत प्रशिक्षण न घेता जवळपास १५ लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो. मनात एकच जिद्द होती—माझ्या आयुष्याचं मला सोनं करायचं आहे! आज मी प्रशासकीय सेवेत आहे. परंतु, आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जे विद्यार्थी पहिले येतात, ते प्रशासकीय सेवांकडे का वळत नाहीत? आपल्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील अधिकारी येतात, मग आपली मुले कुठे आहेत? याचा विचार आता सर्वांनीच केला पाहिजे,” असा मौलिक सल्ला वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दोडामार्ग इंग्लिश स्कूल येथे तळकोकण विकास मंच आणि आनंदाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून अधिकारी रेडकर बोलत होते.
तिमिरातून तेजाकडे: ‘४०७’ वा मार्गदर्शनाचा टप्पा
या आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना रेडकर म्हणाले की,
”महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी ‘तिमिरातून तेजाकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात झालेला हा आमचा ४०७ वा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. मी सिंधुदुर्गचाच सुपुत्र असल्याने, आपल्या जिल्ह्यातील मुले प्रशासकीय सेवेत चमकताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांची टक्केवारी मिळवून समाधानी न राहता, आतापासूनच ध्येय निश्चित करून प्रशासकीय परीक्षांचा अभ्यास करावा. तुमच्या तयारीसाठी हवी ती मदत करण्यास मी सदैव तयार आहे.”
यावेळी डॉ. महादेव गवस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. “स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित होऊन आपले नाव कमावले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
६५ गुणवंतांचा गौरव; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती
या सोहळ्यात तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या ६५ हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा तळकोकण विकास मंच व आनंदाश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वह्या आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर
प्रमोद गवस (अध्यक्ष, तळकोकण विकास मंच)अविनाश नाईक (विश्वस्त, आनंदाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट)
डॉ. महादेव गवसतुळशीदास सावंत
संजय पाटील (मुख्याध्यापक, दोडामार्ग इंग्लिश स्कूल
रत्नदीप गवस (अध्यक्ष, पत्रकार समिती)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ट्रस्टचे विश्वस्त अविनाश नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तुळशीदास सावंत यांनी मानले.










