खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश

सेवा संकल्प अभियान व स्वच्छता हीच सेवा-२०२६’ अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम; ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्स्फूर्त सहभाग

खेड (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान व स्वच्छता हीच सेवा-२०२६’ या उपक्रमांतर्गत खेड रेल्वे स्थानक येथे विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अभियानात भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सामूहिक श्रमदान केले.
खेड रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळणारा प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद तसेच इतर घनकचरा संकलित करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहभागी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
‘स्वच्छ खेड रेल्वे स्थानक, सुंदर खेड आणि निरोगी पर्यावरण’ हा संकल्प घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले असून, त्याच भावनेतून सेवा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सामूहिक सहभागातून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे खेड रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छतेला चालना मिळाली असून, नागरिकांनीही सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा खेड शहर चिटणीस अक्षया दांडेकर, संजीवनी शेलार, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, शशांक सिनकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, भाजपा खेड शहर चिटणीस अमित खेडेकर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा भटके विमुक्त जाती-जमाती खेड तालुका संयोजक साईराज पवार, मिलिंद शिंदे, आनंद खेडेकर, ओंकार पाटणे, रत्नदीप जाडकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सामूहिक श्रमदानातून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामुळे खेड रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छतेबाबत सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन ही सातत्याने चालणारी लोकचळवळ बनावी, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.