रत्नागिरी:
रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातील एका अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकल्यावर ‘ब्रँकियल सिस्ट’ (Branchial Cyst) या अत्यंत दुर्मिळ आणि जन्मजात विकाराची यशस्वी शस्त्रक्रिया येथे करण्यात आली आहे. कान-नाक-घसा (ENT) विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे आणि त्यांच्या पथकाने ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून बालकाला नवजीवन दिले.
काय आहे ‘ब्रँकियल सिस्ट’चा धोका?
ब्रँकियल सिस्ट हा एक जन्मजात विकार असून गर्भावस्थेत मानेच्या भागातील ऊतींची (tissues) वाढ पूर्ण न झाल्यामुळे तो निर्माण होतो. यावरील एकमेव कायमस्वरूपी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. मात्र, ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते.
मानेतील प्रमुख रक्तवाहिन्या, महत्त्वाच्या मज्जातंतू आणि नाजूक अवयवांच्या अगदी जवळून ही सिस्ट जात असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान मोठा धोका असतो. हायपोग्लोसल, व्हॅगस किंवा फेशिअल मज्जातंतूंना इजा झाल्यास जीभ, चेहरा किंवा मानेच्या स्नायूंमध्ये तात्पुरता किंवा कायमस्वरूपी पक्षाघात (Facial Palsy) होण्याचा, तसेच गिळण्यास त्रास होण्याचा धोका असतो. सिस्टचा छोटासा भाग जरी शरीरात राहिला, तरी हा आजार पुन्हा उफाळून येऊ शकतो.
अत्याधुनिक तंत्र आणि सूक्ष्म नियोजन
डॉ. सुनिता बागे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि आधुनिक शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करून संपूर्ण ब्रँकियल सिस्ट सुरक्षितपणे काढून टाकली. शस्त्रक्रियेपूर्वी बालकाच्या आईची भीती आणि चिंता दूर करण्यासाठी त्यांनी सविस्तर माहिती देत त्यांचे समुपदेशनही केले. सध्या बालकाची प्रकृती उत्तम असून तो लवकरच नियमित आयुष्य जगू शकेल, असा विश्वास डॉ. बागे यांनी व्यक्त केला आहे.
‘एक रुपयाही खर्च नाही’; गरीब कुटुंबाला मोठा आधार
या शस्त्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि दिलासादायक पैलू म्हणजे आर्थिक बाजू. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो, मात्र रत्नागिरी शासकीय रुग्णालयात संपूर्ण उपचार प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून पार पडली. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडला नाही. सांघिक प्रयत्नांना यश
या क्लिष्ट शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख आणि डॉ. प्रियांका साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. तसेच बालरोग विभागातील परिचारिकांनी बालकाची उत्तम काळजी घेतली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. सुनिता बागे यांचे विशेष अभिनंदन केले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रशासकीय सहकार्यामुळे ही उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली, बद्दल डॉ. बागे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सांगवीकर यांनीही या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी शासकीय रुग्णालयाची मोठी कामगिरी! ५ वर्षांच्या बालकावरील अत्यंत दुर्मिळ ‘ब्रँकियल सिस्ट’ची...













